बऱ्याच वेळेला मानसशास्र्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावर सल्ला दिला जातो कि आपण आधी पेशंटची मानसशास्त्रीय तपासणी किंवा Psychometric Test करून घेऊया. या चाचण्या म्हणजे नक्की काय असतात? त्याचा उपयोग कसा होतो? त्या करण्यामागचे फायदे काय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.
मानसशास्त्रीय चाचण्या ह्या एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेची व वागण्या बोलण्याची तपासणी करणाऱ्या संरचित व प्रमाणीत केलेल्या प्रश्नांचा संच असतो. सहसा या तपासण्या 'हो' 'नाही' आशी उत्तरं असणारे प्रश्न विचारतात. आपल्याला येणाऱ्या अनुभवाप्रमाणे आपण यांचे उत्तर प्रामाणिकपणे देणे अपेक्षीत असते.
या चाचण्यांमध्ये व्यक्तीचा स्वभाव, बुद्धीमत्ता, भावना, नैसर्गिक क्षमता व कार्य कौशल्य यांचे मोजमाप केले जाते. त्याच बरोबर काही प्रकारच्या मानसिक आजारांची जडण झाली असल्यास त्याचा अंदाज देखील या तपासावाटे लावता येतो. या चाचण्या प्रशिक्षीत मानस शास्त्रज्ञांद्वारे दिल्या जातात. त्याचे विश्लेषण केले जाते व त्यातून तयार झालेला अहवाल समजावून सांगितला जातो. याच बरोबर या पुढे उपचारासंदर्भात कोणता मार्ग योग्य असेल याचा देखील सल्ला दिला जातो.